ऑनलाईन टीम / पुणे :
‘प्लॅनेट मराठी’चे अक्षय बर्दापूरकर आणि ‘गोल्डन रेशो फिल्म्स’चे पियूष सिंह ‘चंद्रमुखी’ या त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी खबरदारी घेऊन या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
अक्षय बर्दापूरकर हे सलग तिसऱ्यांदा पियूष सिंह यांच्यासोबत चित्रपटाची निर्मिती करत आहेत. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित असलेला हा चित्रपट येत्या नोव्हेंबर महिन्यात ऑन फ्लोअर जाणार आहे. या जागतिक महामारीच्या प्रसंगातून सावरत पुढे येणारे हे पहिले मराठी बॅनर असेल.
चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार या बद्दल बोलताना दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, दिग्दर्शक म्हणून माझा पुढील चित्रपट ‘चंद्रमुखी’ येत्या नोव्हेंबरला ऑन फ्लोअर जातोय. अर्थात सर्व प्रकारची योग्य काळजी घेऊनच शूटिंग केले जाईल. बऱ्याच दिवसांनी चित्रपटाच्या सेटवर जातोय, नवीन कामाची सुरुवात होतेय, याचा आनंद आहेच. पण त्याचसोबत जबाबदारी देखील आहे. जानेवारीमध्ये ‘चंद्रमुखी’चं पोस्टर तुम्ही पाहिलं, त्याला खूप प्रेम दिलं. आता तुम्हांला जाणून घ्यायचं असेल की ‘चंद्रमुखी’ च्या भूमिकेत नक्की कोणती अभिनेत्री आहे आणि इतर कलाकार सुद्धा कोण आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याची आणि माझी नवीन कलाकृती लवकरात लवकर तुमच्या समोर आणण्याची माझी देखील इच्छा आहे.
या चित्रपटात प्रसाद ओक यांचे दिग्दर्शन, चिन्मय मांडलेकर यांची पटकथा, संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी, निलेश वाघ यांचे कला दिग्दर्शन पाहायला मिळणार आहे. तसेच अजय-अतुल यांचे अस्सल मातीतले संगीत ऐकण्याची संधीही मिळणार आहे.