वार्ताहर/ हुबळी
धारवाड जिल्हा पंचायत सदस्य आणि भाजप नेते योगीश गौडा यांच्या हत्या प्रकरणी अटकेत असलेले माजी मंत्री विनय कुलकर्णी यांचे नातेवईक चंद्रशेखर इंडी यांना धारवाडच्या तृतीय अतिरिकत जिल्हा आणि सीबीआय विशेष न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
शनिवारी सीबीआय अधिकाऱयांनी विजापूर येथून चंद्रशेखर इंडी यांना अटक केली होती. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी चंद्रशेखर यांची विचारणा केली. यावेळी त्यांनी आपल्याला 12 डिसेंबर रोजी दुपारी सीबीआयने आपल्याला ताब्यात घेतले. कारवाईपूर्वी आपल्याला कोणतीही नोटीस किंवा माहिती देण्यात आलेली नाही. योगीश गौडा हत्या प्रकरणात आपला कोणत्याही प्रकारे सहभाग नाही. तरी देखील आपल्याला चौकशीसाठी बोलावून घेण्यात आले होते. आपण चौकशीसाठी सहकार्य केले, अशी माहिती दिली.
12 डिसेंबर रोजी आरोपीला अटक केली असताना न्यायालयात हजर करण्यास का विलंब झाला?, असा प्रश्न न्यायाधीशांनी केला. त्यावर सीबीआय अधिकाऱयांनी लेखी उत्तर देऊन चंद्रशेखर इंडी यांना दोन दिवसांकरिता आपल्या ताब्यात द्यावे, अशी विनंती न्यायालयाकडे केली. त्यावर आक्षेप घेत इंडीच्या वकिलांनी 10 ते 15 वेळा सीबीआयच्या चौकशीसाठी आरोपी हजर झाले आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा सीबीआय कोठडी देणे योग्य नाही, असा युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायालयाने इंडी यांना 28 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली.