ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेश सरकारने नोएडा शूटिंग सेंटरचे नाव चंद्रो तोमर यांच्या नावाने ओळखले जाणार असल्याची घोषणा केली आहे. शूटर दादी यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चंद्रो तोमर यांचे नुकतेच 30 एप्रिल रोजी निधन झाले होते.
या संदर्भात अधिक माहिती देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, मातृ शक्तीला नमन करत उत्तर प्रदेश सरकारने मिशन शक्ती अभियान सुरू ठेवण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. त्यांच्या नावाने सुरू केलेले शूटिंग सेंटर युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
89 वर्षीय चंद्रो तोमर यांना 26 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. कोरोना संक्रमणातच त्यांना ‘ब्रेन हॅमरेज’ झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, चंद्रो तोमर यांना ‘शूटर दादी’ या नावाने ओळखले जाते. दादीचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील जोहडी. आजही त्या गावात प्रचंड गरीबी आहे. 1999 साली या गावात पहिली शूटिंग रेंज उभारण्यात आली. चंद्रो तोमर दादी आपल्या नातीला या रेंजमध्ये घेऊन शिकवण्यासाठी भरती करायला गेली. एके दिवशी दादीने पिस्तूलमध्ये काडतूस घातले आणि निशाणा लावला. तो निशाणा अगदी अचूक लागला.
दादी स्त्रीवाद्यांसाठी आदर्श आहे आणि गेल्या 20 वर्षात तिने अनेक मुलींना शूटिंगमध्ये प्रशिक्षण दिले आहे. चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर यांच्या जीवनावर ‘सांड की ऑंख’ नावाचा एक हिंदी चित्रपटही बनवण्यात आला आहे.