वार्ताहर / देवराष्टे
आकाशात घडणाऱ्या घटना या नेहमीच खगोलप्रेमींसह सर्वसामान्यासाठी कुतूहलाच्या असतात. अशीच एक घटना आज शनिवारी ५ वाजून ४५ मिनिटांनी दिसणार आहे. यावेळी आकाशात चंद्र आणि मंगळाची पिधानयुती पहावयास मिळणार आहे.
पिधान म्हणजे काय ?
जेव्हा चंद्र एखाद्या तेजस्वी तारा किंवा ग्रहासमोरुन जातो तेव्हा तो तारा किंवा ग्रह काही काळासाठी दिसेनासा होतो अशा प्रकारच्या घटनेला पिधान असे म्हणतात. पिधान म्हणजे एक प्रकारचे ग्रहणच असते. जस जसा सुर्य मावळतीला जाइल तसे त्याचा संधिप्रकाश कमी होऊन ही पिधानयुती ठळकपणे दिसेल. सायंकाळी सुर्य मावळल्यानंतर चंद्राची कोर आकाशात दिसेल. तर सायंकाळी ७ वाजून १९ मि. चंद्राच्या प्रकाशित भागाच्या खालच्या भागातून मंगळ ग्रह बाहेर पडताना दिसणार आहे. पिधानयुती पाहण्याचा योग बऱ्याच वर्षांनी आला असुन हे दृश्य तब्बल दोन तास पाहता येणार आहे.
आज होणारी चंद्र-मंगळ पिधान युती भारतातून दिसणार आहे. मुंबईत संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी मंगळ ग्रह चंद्रबिंबाआड जाण्यास सुरुवात होईल. मात्र सूर्यप्रकाशामुळे हे दृश्य पाहता येणार नाही. त्यानंतर ७ वाजून १९ मिनिटांनी तो चंद्रबिंबाआडून बाहेर येईल. आकाशात पश्चिमेला हे दृश्य दिसेल.