देशात संमिश्र प्रतिसाद -पंजाब-हरियाणात उत्स्फूर्त – काही ठिकाणी तणाव
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी शनिवारी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. पंजाब-हरियाणातील शेतकऱयांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभाग दर्शवला असला तरी बहुतांश राज्यांमध्ये ‘चक्का जाम’ला संमिश्र किंवा अत्यल्प प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. ‘चक्का जाम’ आंदोलनापूर्वी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मोठा फौजफाटा तैनात केला होता. महत्त्वाचे म्हणजे दिल्लीच्या सीमेवर तिन्ही आंदोलन ठिकाणाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते.
दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता देशभरात शेतकऱयांनी पुकारलेल्या ‘चक्का जाम’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी शेतकरी आंदोलकांनी रस्त्यावर येत वाहतूक रोखली. आंदोलकांनी पंजाब, हरियाणात जाणारे महामार्ग बंद केले. गाझीपूर सीमेवरही शेतकऱयांनी आंदोलन केले. दुपारी 12 ते 3 या वेळेत ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडमध्ये या राज्यांना ‘चक्का जाम’ आंदोलनातून वगळण्यात आले असून उर्वरित देशभरात आंदोलन झाले. ‘चक्का जाम’च्या काळात अत्यावश्यक सेवेतील आणि शाळेच्या बस व रुग्णवाहिकांना मोकळीक देण्यात आली होती.
कृषी कायद्यांविरोधात पंजाब हरियाणामध्ये सुरूवातीपासूनच रोष उमटताना दिसत आहे. आजच्या चक्का जाम आंदोलनाला पंजाबमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. संगरूर जिह्यातील मूनाक-तोहना महामार्गावर महिलांनी ठिय्या देत वाहतूक रोखली. शेतकऱयांनी पुकारलेल्या चक्का जामला जम्मूमध्येही प्रतिसाद मिळाला. आसाममध्ये काही राजकीय पक्षांनी चक्का जामला पाठिंबा दिला. आंदोलकांनी रस्त्यावर येत जम्मू-पठाणकोट महामार्ग रोखला. कर्नाटकात बेंगळूर येथे आंदोलन सुरू झाल्यानंतर काही आंदोलकांनी येलहंका पोलीस ठाण्यासमोर येऊन धरणे देण्यास सुरूवात केली. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कृषी कायद्याविरोधात देशभरात शेतकऱयांनी चक्का जाम आंदोलनाची हाक दिली होती.
दिल्लीत 10 मेट्रो स्टेशन बंद
दिल्लीमध्ये खबरदारी म्हणून शनिवारी 10 मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली होती. यामध्ये मंडी हाऊस, दिल्ली गेट, विद्यापीठ, खान मार्केट, नेहरु प्लेस, लाल किल्ला, जामा मशीद, जनपथ आणि केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशनचा समावेश होता. पोलिसांनी येथे 12 मेट्रो स्टेशनला अलर्ट केले होते.