काबुल \ ऑनलाईन टीम
अफगाणिस्तानवर तालिबानी दहशतवादी संघटनेनं ताबा मिळवताच तेथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होतेय. या अफगाणी नागरिकांनी हुकूमशाही राजवटीखाली जगण्यापेक्षा देश सोडून जाणे स्वीकारले आहे. विशेष करून महिला वर्गामध्ये दहशत पसरली आहे. तालिबानच्या राजवटीत महिलांनी नरकयातना भोगल्या आहेत. मात्र अशा स्थितीमध्ये १७ ऑगस्टला अफगाणिस्तानमध्ये पहिल्यांदाच एका महिला अँकरने तालिबानच्या वरिष्ठ सदस्याची मुलाखत घेतल्याचा दावा टोलो न्यूजने केला आहे. या मुलाखतीचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
अफगाणिस्तानमधील टोलो न्यूज चॅनेलनं तालिबान प्रवक्ता मौलवी अब्दुलहक हेमाद याची मुलाखत घेतली. ही मुलाखत महिला अँकर बेहेशता अरघंद हिने घेतली. अफगाणिस्तानमध्ये पहिल्यांदाच एका महिला अँकरने तालिबानच्या वरिष्ठ सदस्याची मुलाखत घेतल्याचा दावा टोलो न्यूजने केला आहे. महिला अँकर तालिबानच्या प्रवक्ताला निर्भीडपणे प्रश्न विचारत असल्याचं दिसत आहे.
टोलो न्यूजचे संस्थापक साद मोहसेनी यांनी तालिबानच्या प्रवक्त्यांना तुमची मुलाखत एक महिला अँकर घेणार असं सांगितलं. त्यावर त्यांनी कोणतीही आडकाठी न आणता होकार दिला. ते सांगू शकले असते की अँकर बदला. मात्र त्यांनी तसं केलं नाही, अशी माहिती मोहसेना यांनी दि गार्डियनला दिली आहे. दरम्यान, चॅनेलने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महिला पत्रकारांना १५ ऑगस्टला घरी पाठवलं होतं. मात्र दोन दिवसात त्या कामावर परत आल्या आणि अफगाणिस्तानात रिपोर्टींग सुरु केली. यापूर्वी तालिबानच्या शासन काळात महिलांना काम करण्याचे अधिकार नव्हते. मात्र आता तालिबानच्या विचारात बदल झाल्याचं दिसून येत आहे.