वार्ताहर / किणये
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढला आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यात मंगळवारी रात्रीपासून क्लोजडाऊन लागू करण्यात आला आहे. प्रशासनामार्फत मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा व सामाजिक अंतर ठेवा असे वारंवार सांगण्यात येत आहे. तरीही काही नागरिक याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. मानव जातीवर ओढावलेल्या या कोरोना संकटाची जाणीव कदाचित आता वन्य प्राण्यांनाही होऊ लागली असावी. यामुळेच टिळकवाडी परिसरात चक्क माकडांनीही सामाजिक अंतराचे भान राखल्याचे चित्र पहावयास मिळाले.
शहराबरोबर तालुक्यात मंगळवारी हनुमान जयंती उत्साहात व साधेपणाने साजरी करण्यात आली. अनेक भाविकांनी हनुमंताचे दर्शन घेतले. महर्षि रोड टिळकवाडी परिसरात पाच-सहा माकडांनी प्रवेश केला. विविध प्रकारच्या झाडांवर असणारी फळे खाण्यासाठी ही माकडे फिरत होती. मंगळवारी दुपारी टिळकवाडी येथील एका बिल्डिंगवरती ही माकडे बसली
होती.
ही माकडे एकमेकाच्या जवळ न बसता सामाजिक अंतर ठेवून अगदी निवांतपणे बसलेली होती. परिसरातील नागरिक कुतुहलाने या माकडांकडे पाहत होते. आता आम्ही वन्यप्राणी माणसांना लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करीत आहोत. तुम्हीही कोरोनाकडे दुर्लक्ष करू नका, प्रशासनाच्या सर्व नियमावलींचे पालन करून स्वतःसह आपल्या कुटुंबीयांचे आरोग्य सांभाळा, असा संदेशच या माकडांनी दिला आहे.