ऑनलाईन टीम / मुंबई :
‘निसर्ग ‘ चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणतात, महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट घोंघावत असतानाच चक्रीवादळाचा तडाखा बसला.संकट म्हटले तर मोठे होते. पण हे संकट आपण सगळ्यांनी परतवून लावले आहे. जनता व प्रशासनाने झूंज दिली व संकटाची तीव्रता कमी केली. दुर्दैवाने दोन जीव अपघातात गेले. कोकणात तसेच इतरत्र नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मुंबा देवीचीच कृपा मुंबईवर आहे. तसेच पंढरपूरच्या विठूमाऊलींचे आशीर्वाद आहेत. मुख्य म्हणजे या वादळाला थोपवून सामना करणारे महापालिका अधिकारी, जिल्हा प्रशासन,आपत्कालीन व्यवस्थापन, वैद्यकीय पथके या सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
वृत्तवाहिन्यासुद्धा लोकांना चांगली माहिती देत होत्या. निसर्गापुढे कोणाचेही चालत नाही. पण संकट काळात महाराष्ट्र एक आहे. खंबीर आहे हे या वादळात दिसून आले. हीच आपली एकजूट महाराष्ट्राला सर्व संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.