साहित्य : अर्धी वाटी मक्याचे पीठ, पाव वाटी मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लोर, 1 चमचा तेल, चवीपुरते मीठ, रोलिंगसाठी मैदा, तेल तळण्यासाठी, मसालाः 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा लाल तिखट पावडर, 1 चमचा शुगर पावडर, चवीपुरते मीठ
कृती : बाऊलमध्ये मक्याचे पीठ घ्यावे. त्यात मैदा, कॉर्नफ्लोर, तेल आणि मीठ घालून मिश्रण मिक्स करावे. नंतर त्यात आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून त्याचा मध्यमसर गोळा मळावा. आता त्याचे एकसमान मध्यम आकाराचे गोळे बनवावेत. पोळपाटावर मैदा पसरवून त्यावर गोलाकार आकारात पोळी लाटावी. आता चाकूच्या सहाय्याने त्याचे उभट तुकडे करावेत. तयार झालेल्या रिबनची दोन्ही टोकं एकमेकांना चिकटवून त्याची रिंग बनवून घ्यावी. गॅसच्या मध्यम आचेवर तेल गरम करावे. तेल चांगले गरम झाले की आच मंद करून त्यात रिंग सोनेरी रंगावर तळून घ्यावे. आता तयार चटपटीत रिंग ताटात काढून त्यावर मसाला साहित्य भुरभुरून खाण्यास द्या.