कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्य चतुर्थश्रेणी कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ गुरूवारी चतुर्थश्रेणी कर्मचार्यांनी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शुक्रवारी, 29 रोजी चतुर्थश्रेणी कर्मचारी लाक्षणिक संप करणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारी गट ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश भोसले यांनी दिली.
संघटनेने दिलेल्या निवेदनात शासनाने सर्व क्षेत्रात खासगीकरणाचे धोरण स्वीकारले आहे. चतुर्थश्रेणी कर्मचार्यांची सेवा ठेकेदारांकडे सोपवून चतुर्थश्रेणी कर्मचार्यांना संपवण्याचे धोरण राज्य शासन राबवत आहे. त्यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचार्यांची रिक्त पदे भरली जात नाहीत. रिक्त पदे भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे, तरीही शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. चतुर्थश्रेणी कर्मचार्यांच्या प्रलंबित 25 मागण्यांसंदर्भात निर्णय घ्यावा, यासाठी राज्य कर्मचारी महासंघाने तीन दिवसीय आंदोलन केले आहे. यामध्ये बुधवारी कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून काम करत निषेध नोंदवला. गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी शासनाच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
आंदोलनात चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश भोसले, शिवाजी निकम, महेश पाटील, संजय क्षीरसागर, ज्योती खोत, शरद कामत, गणेश आसगावकर, छाया कांबळे, बाजीराव कांबळे, सुरेश बागडी, विश्वास पाटील आदी सहभागी झाले होते.