बेळगाव : / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे प्रवासाच्या पातळीवर काहीशी सवलत मिळाल्याने शहरात नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे वाढत्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. शहरात प्रवेश करणाऱया चन्नम्मा सर्कलमध्ये वाहतुक कोंडीला निर्माण झाली. एकीकडे प्रशासन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा असे आवाहन करत आहे. दुसरीकडे मात्र वाढती गर्दी व वाहतुक कोंडीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून येत आहे.
स्मार्ट सिटीच्या योजनेंतर्गत चन्नम्मा सर्कलमध्ये कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्यावर एकेरी वाहतुक सुरू आहे. त्याबरोब्रा चन्नम्मा सर्कलपासून काकतीवेसकडे जाणारी वाहतूक बॅरीकेड्स लावून बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात येणाऱया नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाला वळसा घालून यावे लागत आहे. शहरातील बरचसे रस्ते गर्दी टाळण्यासाठी बॅरीकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे इतरत्र रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. शनिवारी बाजारचा दिवस असल्याने शहरात अवजड वाहनांची संख्या वाढली होती. त्यामुळे ठिक-ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. सध्या लॉकडाऊनमुळे शहरातील महत्त्वाचे रस्ते वगळता इतर रस्ते बंद ठेवण्यात आले आहे. त्याबरोबर गल्ली-बोळात बॅरीकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या रस्त्यांवर वाहतूक वाढत आहे.