पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि काँग्रेसचे उमेदवार शुभदीप सिंह (सिद्धू मूसेवाला) विरोधात निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. हे दोन्ही नेते मानसामध्ये शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रचाराची मुदत संपल्यावरही प्रचार करताना आढळून आले आहेत. सिटी-1 मानसा पोलीस स्थानकात भादंविचे कलम 188 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मूसेवाला यांच्यासाठी घरोघरी प्रचार करण्याकरता चन्नी शुक्रवारी संध्याकाळी मानसा येथे पोहोचले होते. एफआयआरनुसार मानसा येथील आम आदमी पक्षाचे उमेदवार डॉ. विजय सिंगला यांनी निवडणूक पर्यवेक्षक सी.के. यादव यांच्याकडे तक्रार अर्ज सोपविला होता. यात काँग्रेस नेत्यांनी आचार संहितेचे उल्लंघन केल्याचे नमूद करण्यात आले होते.
भरारी पथकाकडून प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आल्यावर निवडणूक अधिकाऱयांना चन्नी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. मूसेवाला हे 400 हून अधिक समर्थकांसोबत प्रचार करत होते. हे प्रमाण अनुमतीप्राप्त मर्यादेपेक्षा अधिक आहे.
तर मानसाच्या सरदुलगढचे काँग्रेस उमेदवार विक्रम सिंह मोफर यांच्यावर शुक्रवारी विना अनुमती रोड शो आयोजित केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. मोफर यांच्याविरोधात झुनीर पोलीस स्थानकात भादंविचे कलम 188 आणि 171-एफ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.