नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँगेसचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्या विरोधात भारतातील सर्व विमानतळांवर लुकआऊट नोटीस लागू करण्यात आली आहे. पंजाबच्या दक्षता विभागाने हा आदेश लागू केला आहे. चन्नी हे आणखी काही दिवसांनी अमेरिकेला जाणार होते. मात्र, मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी त्यांना आव्हान दिले होते. त्यानंतर त्यांनी आपला अमेरिकेचा दौरा रद्द केला होता. चन्नी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या फायली आमच्या हाती आहेत. ते आता देशाबाहेर पळून जाण्याची तयारी करु शकतात, अशा शब्दांमध्ये मान यांनी चन्नी यांना आव्हान दिले होते. चन्नी यांनीही त्यांना प्रतिआव्हान देताना आपण अमेरिका दौरा रद्द करत आहोत, असे स्पष्ट केले होते. आता चन्नी यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस लागू करुन मान यांनी त्यांना पुन्हा आव्हान दिले होते. पंजाबमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी चन्नी हे अल्पकाळासाठी मुख्यमंत्री होते. त्या काळात त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले जात आहेत. भगवंतसिंग मान यांनी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.