वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आपण केलेल्या पापांची कबुली (कन्फेशन) चर्चमध्ये जाऊन देण्याची पद्धती ख्रिश्चनधर्मियांमध्ये आहे. काही चर्चेसमध्ये ही कबुली देण्याच्या प्रथेची सक्ती करण्यात येते. या सक्तीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करण्यात आली असून न्यायालयाने सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही याचिका केरळमधील मलानकारा ऑर्थोडक्स सिरियन चर्चसंबंधातील आहे. या चर्चमध्ये पापांची कबुली देण्याची सक्ती केली जाते असा आरोप एका ख्रिश्चन महिलेने केला असून तिनेच ही याचिका सादर केली आहे. ही सक्ती धार्मिक स्वातंत्र्य आणि घटनेने प्रदान केलेल्या खासगित्वाच्या अधिकाराच्या विरोधात आहे, असे या महिलेचे म्हणणे आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वातील खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी होणार आहे.
बिना टिट्टी असे या महिलेचे नाव आहे. तिच्या याचिकेत काही सुधारणा करण्याची अनुमती शुक्रवारी न्यायालयाने दिली. यासंदर्भात प्रथम केरळ उच्च न्यायालयात याचिका का सादर करण्यात आली नाही, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली. साबरीमला प्रकरणात अशा प्रकारच्या मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यामुळे येथेच ती व्हावी असा युक्तीवाद याचिकाकर्त्या महिलेचे वकील मुकुल रोहटगी यांनी केला.