क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आय-लीग फुटबॉल स्पर्धेत आपली अग्रस्थानावरील आघाडी चार गुणांनी वाढविताना गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबने कडव्या संघर्षानंतर गोकुळम केरळचा 3-2 अशा फरकाने पराभव केला. या विजयाने चर्चिल ब्रदर्स संघाला तीन गुण प्राप्त झाले. त्यांचे आता 10 सामन्यांतून सहा विजय व चार बरोबरीने 22 गुण झाले असून पहिले स्थान अबाधित आहे. गोकुळम केरळचा हा दहाव्या सामन्यांतील चौथा पराभव असून पाच विजय व एका बरोबरीने त्यांचे 16 गुण झाले आहेत.
कोलकाताच्या किशोर भारती क्रीडांगणावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात चर्चिल ब्रदर्सच्या लुका माझसेनने मोलाचा वाटा उचलताना 26 व 87 व्या मिनिटाला दोन गोल केले. एक गोल किंग्सली फर्नांडिसने 53 व्या मिनिटाला केला. पराभूत गोकुळम केरळसाठी फिलीप एडझाहने 80 व्या तर एम. एस. जिथीनने इंज्युरी वेळेत गोल नोंदविला.
सामन्याच्या 26 व्या मिनिटाला चर्चिल ब्रदर्सने गोल करून आघाडी घेतली. ब्रायस मिरांडा आणि विनील पुजारीच्या चालीवर लुका माझसेनने गोकुळमच्या गोलरक्षकाला भेदले आणि आघाडीचा गोल केला. मध्यंतरानंतर 53 व्या मिनिटाला किंग्सली फर्नांडिसने प्रतिस्पर्धी गोलरक्षक उबैदला चकविले आणि चेंडू जाळीत टाकला.
शेवटच्या बारा मिनिटात उभय संघाकडून तीन गोल झाले. प्रथम गोकुळम केरळच्या फिलीप एडझाहने सॅबेस्तियान थांगमुवानसांगच्या क्रॉसवर व्हॉलीद्वारे चर्चिल ब्रदर्सच्या गोलरक्षकाला भेदले व गोल केला. त्यानंतर 87 व्या मिनिटाला चर्चिलच्या झुनिगाला नावोचा सिंगने पाडल्याबद्दल मिळालेल्या पेनल्टीवर माझसेनने चर्चिलचा तिसरा गोल करून आघाडी 3-1 अशी वाढवली. शेवटी इंज्युरी वेळेत गोकुळम केरळच्या जिथीनने दुसरा गोल केला.
प्रकाशझोतात खेळविण्यात आलेल्या लढतीत पंजाब एफसीने 65 व्या मिनिटाला बाबा दियावाराने केलेल्या एकमेव गोलमुळे नेरॉका एफसीचा पराभव केला. विजयाच्या तीन गुणानी पंजाब एफसीचे आता 10 सामन्यांतून 18 तर नेरॉका एफसीचे 8 गुण झाले आहेत.