जलवाहिन्या फोडल्याने डिपॉझिट रक्कमेतून दुरूस्तीचा निर्णय
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी शहरात सीएनजी गॅस वाहिनीसाठी केल्या जाणाऱया चर खोदाईमुळे अनेक ठिकाणी जुन्या व नवीन जलवाहिन्या फुटून त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम होत आहे. या चर खोदाईत बेपरवाई करणाऱया सीएनजी कंपनीच्या डिपॉझिट रक्कमेतून जलवाहिन्या दुरुस्त्या करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या सभेत घेण्यात आला. कंपनीने ही जबाबदारी न स्वीकारल्यास चर खोदाईचे काम बंद करण्याचा इशारा नगराध्यक्ष साळवी यांनी दिला आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गॅस वाहिनीसाठी शहरात सुरू असलेल्या चर खोदाईचा विषय उपस्थित झाला. भाजपाचे नगरसेवक राजू तोडणकर, मुन्ना चवंडे, यांनी चर खोदाईमुळे नुकसान झालेल्या जलवाहिन्यांच्या दुरूस्तीत सीएनजी कंपनीकडून चालढकल होत असल्याचा आक्षेप घेतला. या नुकसानीस सीएनजी गॅस कंपनीला जबाबदार धरत त्या कंपनीनेच जलवाहिन्यांची दुरूस्ती करून दय़ायची असल्याचे नगराध्यक्ष साळवी यांनी सांगितले. नागरिकांना पाणी मिळण्यासाठी तत्काळ दुरुस्त्या करून होणारा खर्च सीएनजीच्या डिपॉझिट रक्कमेतून अदा करण्याच्या सूचना पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱयांना केल्या. यामुळे सीएनजी कंपनीला नगर परिषदेकडून दणका मिळाला आहे.
नव्या पाणी योजनेच्या पाईलाईनला अनेक ठिकाणी गळत्या लागल्याची बाब भाजपा नगरसेवक राजू तोडणकर, मुन्ना चवंडे यांनी मांडली. तसेच न.प.च्या पाणी विभागातील कर्मचारी दैनंदिन कामासह नव्या नळजोडण्या देण्याची कामे करत असून ते दबावाखली काम करत असल्याचे सांगण्यात आले. नव्या नळ जोडण्यांचा ठेका खाजगी कंपनीला देण्यात आलेला आहे. त्यामुळे जलवाहिन्या फुटल्या असतील तर स्थानिक नगरसेवकांनी अधिकाऱयांना तसे पत्र देऊन हरकत नोंदवण्याच्या सूचना नगराध्यक्ष साळवी यांनी यावेळी केल्या.
जन्म-मृत्यू दाखले तातडीने देण्याचे निर्देश
नगर परिषदेच्या सेतू कार्यालयात वेळेत जन्म-मृत्यूचे दाखले देण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात यावी. नागरिकांचे सेवेतून समाधान होईल याकडे कर्मचाऱयांनी कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचनाही नगराध्यक्ष साळवी यांनी केल्या. न.प.कडे जन्म, मृत्यूची नोंदणी असेल तर अर्जदाराला तातडीने दाखले देण्यात यावेत. त्यासाठी सेतूबाहेर नागरिकांच्या माहितीसाठी फलक लावण्यात यावा. नागरिकांची दाखले, व घटपट्टी भरून घेण्यात टाळाटाळ झाल्याची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. अशी टाळाटाळ आढळल्यास नागरिकांनी तातडीने संपर्क करण्याच्या सूचनाही साळवी यांनी या सभेत दिल्या.
कायमस्वरुपी 52 कामगारांना खोल्या देण्याचा ठराव
न.प.आस्थापनेवरील कायमस्वरूपी सफाई कामगारांना विश्वनगर येथे 39 व मेहतर चाळ येथे 13 खोल्या देण्यात आल्या आहेत. या खोल्या त्यांना मालकी तत्वावर देण्याच्या मागणीवर सभेत चर्चा झाली. आस्थापनेत 25 वर्ष झालेल्या कामगारांचाच यात समावेश केला जावा. त्यासाठी कामगारांचा परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात यावा. नियमबाहय़ यादी पाठवल्यास त्याची सर्व जबाबदारी प्रशासनातील अधिकाऱयांची राहिल, असे नगराध्यक्ष साळवी यांनी सभेत स्पष्ट केले.