ऑनलाईन टीम / मुंबई :
भाजप नेते किरीट सोमय्या मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब हे देखील सोमय्यांच्या रडारवर होते. 12 मार्चला सोमय्या यांनी ”आता अनिल परब यांचा नंबर… ”असे सूचक ट्विट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर आज सकाळीच सोमय्या यांनी ”चला अनिल परबांचं रिसॉर्ट तोडूया…” असं नवं ट्विट केल्याने घडामोडींना वेग आला आहे.
सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”26 मार्च – चला दापोली…. अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडूया…” अनिल परब यांचे रिसॉर्ट अनधिकृतपणे आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप किरीट सोमय्या सातत्याने करत आहेत. त्यानंतर आता तारीख जाहीर करुन रिसॉर्ट तोडण्याबाबत ट्विट केलं आहे.
दरम्यान, सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच रश्मी ठाकरे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचे कोकणात अनधिकृत बंगले असल्याचा आरोप केला होता. यासोबत किनारपट्टी भागात अनिल परब यांचे बंगले असल्याचे सांगितले होते. मुरुड गावात परब यांनी बेकायदेशीररित्या रिसॉर्ट आणि बंगला बांधला आहे. ज्याची चौकशी सुरु असून येत्या काही दिवसांत त्यावर कारवाई होणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच परब यांच्या रिसॉर्टचे दोन फोटोही शेअर केले होते.