मेकिंग सातारा गुपचा आगळवेगळा उपक्रम दर रविवारी सदस्याकडून भिंती रंगवण्याचे काम
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट होत असताना सातारकरांना या संकटाचा सामना करण्यास प्रेरणा मिळावी म्हणून ‘मेकिंग सातारा’ गुपने शहर सुंदर बनविण्याचा विडा उचला आहे. या मोहिमेत तरूणाईचा मोठा सहभाग आहे. या गुपचे सदस्य शहरातील विविध ठिकाण रंगवण्याचे काम दर रविवारी करत असल्याची माहिती ग्रुपच्या सदस्य नेहा शिरकांडे यांनी दिली.
यावेळी नेहा शिरकांडे म्हणाल्या, प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत नागरिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आपली काळजी घेत आहेत. गेली सात-आठ महिने लोक घरीच राहून कोरोना विषाणूवर मात करत आहेत. मात्र हे करत असताना घरी बसून लोक कंटाळले आहेत. लोकांच्या मनात भीती आहे, तर काही जण या लॉकडाऊनचा योग्य लाभ घेऊन आपापली कामं घरी राहून करत आहेत. यातून त्यांच्यात असलेल्या कलाकार, लेखक जागा होत आहे. त्यांना प्रोत्साहन मिळावे, त्याचबरोबर सातारा शहर सुंदर बनवण्याचा हा एकमात्र उद्देश आहे.
याच उद्देशाने ‘मेकिंग सातारा’ सातारा गुप च्या माध्यमातून आम्ही सातारा शहराला सुंदर बनविण्याचं ठरवलं आहे. त्या सुंदर रंग भरविण्याचं ठरवलं आहे. या मोहिमेत सर्वच शहरवासियांचा सहभाग अपेक्षित आहे. आणि यात आपण नक्की हिरीरिने सहभागी व्हाल याची आशाही आहे. आपण प्रत्येकाने जर यात खारीचा वाटा उचलला तर सातारा शहर सुंदर बनवण्यास वेळ लागणार नाही. एनीबडी ऍन्ड एव्हरीबडी कॅन पेंटच्या घोष वाक्यात आपण या मोहिमेचा शुभारंभ सदरबझार येथील भिंती रंगवून केला. दर रविवारी आपण एकत्र जमून शहरातील विविध भिंती रंगवून सातारच्या सौंदर्यात भर घालणार आहे. सर्वांनी या मोहिमेत सहभागी होवून शहराला सुंदर बनवले पाहिजे असे आवाहन शिरकांडे यांनी केले.