प्रतिनिधी / कोल्हापूर
सध्या कोरोनाच्या काळात कोणाचा, कुठे आणि कधी मृत्यु होईल ? हे सांगणे कठिण बनले आहे. अशा काळात विद्यार्थी चळवळीत एकेकाळी काम करणाऱया एका कार्यकर्त्याचा अचानक मृत्यु झाला. अखेर त्याला चळवळीतील एका मित्रासह मेव्हण्याने कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत अग्नी दिला. युवराज पुंडलिक फराकटे (वय 44 रा. चिमगाव, ता. कागल) असे या कार्यकर्त्याचे नाव आहे.
युवराज फराकटे हे माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांचे कट्टर कार्यकर्ते. युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या चळवळीत एकेकाळी युवराज अग्रेसर होते. मंडलिक गटातून मुश्रीफ गट तयार झाला. तेंव्हा अनेक कार्यकर्ते मुश्रीफ गटात गेले. तेंव्हा फराकटे मंडलिक गटाबरोबर राहिले. पुढे खासदार संजय मंडलिक यांना साथ दिली. सदाशिवराव मंडलिक हमीदवाडा साखर कारखान्यावर फराकटे नोकरीला होता.
काही दिवसांपूर्वी त्यांना मधुमेहाचा त्रास झाल्याने कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. सोमवारी सायंकाळी प्रकृती बिघडल्याने त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्राणज्योत मालविली. कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचा निर्णय झाला. त्यावेळी निवडक लोक उपस्थित होते. अग्नी देण्याचा प्रसंग आला तेंव्हा चळवळीतील मित्र हिदायत मणेर आणि मेव्हणा दिलीप शेंडे यांनी फराकटे यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. विद्यार्थी चळवळीतील एका कार्यकर्त्यांला त्याच्याच चळवळीतील मित्राने दिलेला अग्नी मित्रपरिवाराच्या डोळय़ात पाणी आणणारा ठरला. फराकटे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.