तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
तालुक्यातील चळे याठिकाणी होउ घातलेला बालविवाह आज दुपारी पोलिसाच्या मध्यस्थीने रोखण्यात आला. यामधे निर्भया पथक तसेच चाईल्ड वेलफ़ेअर कमिटी आणि पोलिस उपअधिक्षक डॉ सागर कवडे यांनी मोठे प्रयत्न केले.
याबाबत अधिक माहीती अशी की , 3 फ़ेब्रुवारी 2020 रोजी पोलिसांना एक निनावी तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीनुसार चळे गावामधे मंगळवारी दुपारी 11 वाजून 55 मिनिटांनी बालविवाह होणार होता. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी चाइल्ड वेलफेअर कमिटी आणि निर्भया पथकास सोबत घेउन हा बालविवाह रोखला. यामधे नियोजीत मुहुर्तापूर्वी पोलिसांनी अल्वयीन मुलींच्या पालकांना बालवावाह हा कायद्याने गुन्हा आहे. तसेच याबाबतच्या प्रतिबंधात्मक कायद्याची देखिल माहीती दिली. यानंतर सदरचा बालविवाह हा यशस्वीपणे रोखला गेला.
सदर प्रकरणी चाइल्ड वेलफेअर कमिटी सोलापूरच्या अध्यक्षा यांचे समक्ष संबधित अल्पवयीन मुलीस पालकांसमवेत हजर केले. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे तसेच पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक श्री किरण अवचर यांचे मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाचे पो उप नि. गाडेकर आदि सहभागी होते.
बालविवाह सारख्या अनिष्ट प्रथा कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही यशस्वीपणे बंद करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा प्रकारचा बालविवाह अथवा महिला विषयीच्या अत्याचार अशा घटना घडू नयेत. यासाठी पोलीस दल सदैव दक्ष व तत्पर आहे.
– डॉ सागर कवडे , पोलिस उपअधिक्षक