प्रतिनिधी/ रत्नागिरी, मौजेदापोली
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाचे मानधन देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच प्रकरणी रत्नागिरी तालुक्यातील चवे येथील ग्रामसेवकाला अटक करण्यात आली. दुसऱया घटनेत दापोलीतील आंजर्लेचे मंडल अधिकारी प्रितम कासारे व केळशीचे तलाठी प्रभाकर सोनवणे यांना लाच प्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांनी जिह्यात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार, विनायक नारायण जाधव (38 रा. सध्या जाकादेवी, मूळ अजिंक्यनगर खानापूर ता. भुदरगड,-कोल्हापूर) हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार, चवे ग्रामपंचायतीत ‘रोहयो’ योजनेअंतर्गत ग्रामरोजगार सेवक म्हणून तक्रारदार काम करत आहेत. मार्च व एप्रिल 2019 या 2 महिन्याचे त्यांने 8 हजार 911 रुपये मानधन पंचायत समितीकडून ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झाले होते. हे पैसे देण्यासाठी ग्रामसेवक विनायक जाधव याने 5 हजार रुपये लाचेची मागणी केली. वारंवार विनंती करूनही मानधनाची हक्काची रक्कम न देणाऱया ग्रामसेवकविरोधात या ग्रामरोजगार सेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सापळा लावून ग्रामसेवकाला 5 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक नितीन विजयकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस हवालदार संतोष कोळेकर, प्रकाश सुतार, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. या धडक कारवाईमुळे ग्रामसेवकवर्गात खळबळ उडाली आहे.
खरेदीखताच्या पाठपुराव्यासाठी मागितली लाच
दुसऱया घटनेत दापोली तालुक्यातील केळशी येथे लाचप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदाराने घरासह 12 जून 2018 रोजी जमीन खरेदी केली. त्या जमिनीची नोंद सातबारा उतारावर करण्यासाठी खरेदीखताचे कागद तलाठी प्रभाकर सोनवणे यांच्याकडे दिले होते. यासाठी तक्रारदारांनी दापोली तहसील कार्यालयात मंडल अधिकारी कासारे व तलाठी सोनवणे यांची भेट घेतली असता दोघांनी 15 हजार रूपये लाच मागून ती दिल्याशिवाय काम करणार नसल्याचे सांगितले होते. यामुळे या दोन्ही आरोपींविरोधात तक्रारदाराने 26 डिसेंबर 2019 रोजी रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने 26 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईत कासारे व सोनवणे या दोघांनीही जमिनीची नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी 15 हजार रूपये लाच मागून तडजोडीअंती 10 हजार रूपये स्वीकारल्याचे मान्य केले. पडताळणीत निष्पन्न झाल्यानुसार 31 डिसेंबर रोजी सापळा रचून दोन्ही आरोपींनी 10 हजार रूपये स्वत:साठी व मंडल अधिकारी कासारे यांच्यासाठी दापोली तहसील कार्यालयासमोरील हॉटेल गुरूप्रसाद येथे स्वीकारल्यानंतर तलाठी सोनवणे यांना तहसील कार्यालय आवारातील तलाठी संगणक भवनामध्ये दुपारी पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कदम, हवालदार संदीप ओगले, पोलीस नाईक योगेश हुंबरे, पोलीस शिपाई दीपक आंबेकर व राजेश गावकर सामील झाले होते.