प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने शहरात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाग्रस्तांचा आणि मृतांचा आकडा वाढत चालल्याने सॅनिटायझरची फवारणी करण्याची मागणी वाढत आहे. यामुळे सामाजिक संघटना आणि युवक मंडळाच्यावतीने चव्हाट गल्ली परिसरात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.
शहर व परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून लॉकडाऊन करून सद्या कोरोनाची लढाई सुरू आहे. पण काही ठिकाणी रुग्णांना होमक्वारंटाईन केल्याने स्वच्छतेची आणि सॅनिटायझरची फवारणी करण्याची मागणी होत आहे. शहराच्या प्रत्येक भागात कोरोनाबाधितांची संख्या आढळून येत आहे. यापूर्वी महापालिकेच्यावतीने सॅनिटायझर फवारणी करण्यात येत होती. पण सध्या ही मोहीम थांबविण्यात आली आहे. अत्यावश्यक परिसरात महापालिकेच्यावतीने सॅनिटायझर फवारणी करण्यात येत आहे. तसेच काही सामाजिक संघटना आणि युवक मंडळे सॅनिटायझर करण्यासाठी सरसावली आहेत. सध्या विविध रस्ते बंद असल्याने चव्हाट गल्लीमधून वाहने ये-जा करीत आहेत. त्यामुळे येथील सामाजिक संघटना आणि युवक मंडळाच्यावतीने चव्हाट गल्लीसह विविध परिसरात औषध फवारणी करण्यात आली.