नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाकडून मदत मिळवून देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
सध्या मृग नक्षत्राच्या जोरदार पावसामुळे चव्हाट गल्लीतील घर कोसळून पाच लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. चव्हाट गल्ली हॉटेल राजवाडा व दुर्गा वाईनच्या मागे मारुती पाटील यांचे घर आहे. सतत चार दिवस बेळगाव परिसरात मृग नक्षत्राचा जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मारुती पाटील यांच्या जुन्या घरात पावसाचे पाणी भिंतीवर पाझरून सकाळी हे घर पडले. यावेळी मारुती पाटील यांचे चिरंजीव सुधीर पाटील बाहेरगावी गेले होते. ते घरी येऊन बाथरूमला गेले असता अचानकपणे बाथरूमकडील भिंत कोसळली. ती भिंत शेजारी ठेवलेल्या बॅरलवर पडली.
त्यामुळे रोहित त्या बॅरलच्या बाजुला अडकले. आरडाओरड केल्यानंतर शेजारील नागरिकांनी येऊन रोहितला बाहेर काढले. समोरच्या बाजुला रोहितची आई वेणु मारुती पाटील या माडीवर झोपल्या होत्या. त्याचप्रमाणे पत्नी सुजाता, मुली स्मृती व श्रुती याही झोपल्या होत्या. पण मागील बाजुची भिंत कोसळल्याने सुधीर पाटीलने सर्वांना बाहेर काढले. थोडय़ा कालावधीतच संपूर्ण घर कोसळले. सुदैव म्हणूनच या मोठय़ा दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. जवळपास पाच लाखाहून अधिक नुकसान सुधीर पाटील यांचे झाले असून, शासनाने त्यांना मदत करावी, अशी विनंतीही केली जात आहे. सुधीर पाटील यांची परिस्थिती हालाखीची असून, ते मोलमजुरी करूनच आपले जीवन जगत आहेत. यावेळी उत्तरचे आमदार अनिल बेनके व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबाला सरकारकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.