प्रतिनिधी/ बेळगाव
चव्हाट गल्ली येथील शाळा विक्री प्रकरणी रविवारी मार्केट पोलीस स्थानकात 9 जणांविरुध्द एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. खोटी वटमुखत्यारपत्र तयार करुन शाळेचा व्यवहार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
विनय हणमंतराव माने (रा. कुपवाड, जि. सांगली), जयगौडा शिवगौडा पाटील (रा. हुक्केरी), शांतीनाथ संभाजी राऊळ (रा. शहापूर), रविंद्र चंद्रनाथ चौगला (रा. एकसंबा), दस्तगीर देसाई (रा. संकेश्वर), आयुब मनियार (रा. संकेश्वर), योगेश पाटील (रा. कंग्राळी), सुनील पाटील (रा. महांतेशनगर), बहाद्दुर गुरव (रा. एकसंबा) यांच्यासह एकसंबा येथील बिरेश्वर सोसायटीवरही फिर्याद देण्यात आली आहे.
मार्केट पोलीस स्थानकात भा.दं.वि. 405, 406, 419, 420, 463, 464, 465, 468,471 सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महम्मदगौस मोकाशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शाळेचा व्यवहार कसा झाला? याची माहिती फिर्यादीत देण्यात आली असून पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी पुढील तपास करीत आहेत.