समूह संसर्गाचा प्रारंभिक संकेत
चव बिघडणे आणि गंधक्षमता गमाविणे हा कोरोना विषाणूच्या समूह संक्रमणाचा प्रारंभिक संकेत असल्याचे संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने म्हटले आहे. नेचर कम्युनिकेशन्स या नियतकालिकात यासंबंधीचे अध्ययन प्रकाशित करण्यात आले आहे. टाळेबंदी लागू झाल्याच्या 5 दिवसांनी चव बिघडणे आणि गंधक्षमता गमाविण्याच्या प्रकरणांमध्ये घट दिसून आली आहे. ज्या देशांमध्ये कठोर टाळेबंदी लागू झाली तेथे यात मोठय़ा वेगाने घसरण दिसून आली आहे.
सामान्य लोकसंख्येत अचानक चव बिघडणे आणि गंधक्षमता गमाविण्याच्या प्रकरणांमधील वृद्धी हा कोविड-19 सामूहिक स्तरावर फैलावत असल्याचा संकेत असू शकतो असे अमेरिकेतील पेन स्टेट युनिवर्सिटी आणि अध्ययनाचे लेखक जॉन हेस यांनी नमूद केले आहे.
संशोधकांनी ग्लोबल कंसोर्टियम फॉर केमोसेंसरी रिसर्च सर्वेक्षणाच्या विदाचा अध्ययनात वापर केला आहे. याचबरोबर 7 मेनंतरच्या फ्रान्स सरकारच्या आकडेवारीचाही वापर केला आहे.
इटली अन् ब्रिटनशी तुलना
चव बिघडणे आणि गंधक्षमता गमाविणे कोरोनाच्या समूह संक्रमणाचे संकेत असतात का याविषयी शोध घेण्यासाठी फ्रान्सच्या विदाची तुलना इटली आणि ब्रिटनच्या विदाशी करण्यात आली. या देशांनी विविध वेळी टाळेबंदी लागू केली होती. यात ही दोन्ही लक्षणे कोरोनाच्या सामूहिक स्तरावरील फैलावाचे संकेत असू शकतात असे आढळून आले आहे.