लॉकडाऊन नियमांच्या उल्लंघनप्रकरणी कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारी थोपविण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर पोलिसांची कारवाई सुरूच असून कॉलेज रोडवरील देशी चायवाला या दुकानदाराविरुद्ध येथील खडेबाजार पोलीस स्थानकात केडा कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर अनगोळमध्ये क्रिकेट खेळणाऱयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी बुधवारी ही माहिती दिली. नियम उल्लंघन करून दुकान उघडे ठेवणाऱया देशी चायवाला या दुकानदाराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. टिळकवाडी पोलिसांनी अनगोळमध्ये क्रिकेट खेळणाऱया एका तरुणाला अटक केली असून त्याच्या अन्य साथीदारांनी पलायन केले आहे. त्यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी दिवसभरात अनावश्यकपणे फिरणारी 35 वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. विनामास्क फिरणाऱया 290 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून बेळगाव शहर व उपनगरांत कर्नाटका ऍपिडमिक डिसीज ऍक्टनुसार तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरोना महामारी थोपविण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. अनावश्यकपणे रस्त्यावरून फिरू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी केले आहे.