प्रतिनिधी / सातारा :
गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी शासकीय लवाजमा बाजूला ठेवत दुचाकीवरुन फेरफटका मारत सातारा शहर पोलीस ठाण्यात सोमवारी 12 वाजता अचानक भेट दिली. शहर पोलीस ठाण्यात गृहराज्यमंत्री आणि गैरहजर पोलीस कर्मचारी, अधिकारी असा चांगला मेळ बसला. या भेटीदरम्यान उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून त्यांनी विविध विषय, गुन्हे यांची माहिती घेत कामचुकार अधिकाऱ्यांबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. याचवेळी त्यांनी नगरसेवक बाळू खंदारे याच्यावर दाखल असणाऱ्या गुन्ह्याच्या तपासातील ढिलाईबाबत तपास अधिकारी श्री सुंदर यांना चांगले काम करा, अन्यथा तुमची चौकशी करण्यात येईल असे ठणकावून सांगितले.
गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांच्या ऍन्ट्रीने पोलीस ठाण्यात एकाच वादळ उठले. पोलीस ठाण्याच्या प्रत्येक केबीनमध्ये जात त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची झडाझडती घेण्यास सुरूवात केली. यावेळी शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर शासकीय टोपी नसल्याचे दिसून आले. यामुळे संतापलेल्या देसाई यांनी वर्दीवर टोपी घालत जा, लाज वाटते का, का स्वत:ला हिरो समजता, अशा शब्दात पोलिस कर्मचाऱ्यांचे कान उपटले. यानंतर त्यांनी बीट अंमलदार यांच्या खुर्चीत ठाण मांडले. गेल्या पंधरा दिवसांत घडलेले गुन्हे आणि त्यातील गुन्हेगारांवर काय कारवाई केली, याबाबत विचारणा केली. यांची माहिती घेत असतानाच त्यांनी पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांना पोलिस ठाण्यात आल्याचे मेसेज वायरलेसवरुन देण्यास सांगितले. जिल्हा बँक निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठीच्या बंदोबस्तात वरिष्ठ अधिकारी गुंतल्याने त्यांनी उपस्थित असणाऱ्यांकडून माहिती घेतली. चुकीचे काम करणाऱ्यांवर मला खात्यांतर्गत कारवाई करावी लागेल, अशी तंबीही त्यांनी यावेळी दिली.