बार्देश उपजिल्हाधिकारी बदली प्रकरण : विरोधकांसोबत समस्यांची पाहणी केल्याने घेतला सूड
प्रतिनिधी /म्हापसा
जिल्हा पंचायतसदस्या कविता कांदोळकर व स्थानिक रहिवाशांच्या लेखी मागणीवरुन स्थानिक पंच व रहिवाशांच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकारी कपिल फडते यांनी कोलवाळ बिनानी येथे भेट देऊन कायदा सुव्यवस्थेची पाहणी केली. ते भाजपच्या नेत्यांना न आवडल्याने उपजिल्हाधिकारी फडते यांची इतरत्र बदली केल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी केला आहे.
काणका येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कांदोळकर बोलत होते. उपजिल्हाधिकारी फडते यांनी स्थानिकांच्या तक्रारीनंतरच ही पाहणी केली मात्र सरकारी अधिकारी विरोधकांसोबत पाहणी करतो हे पचनी न पडल्यानेच सरकारने राजकारण करुन एका विश्वासार्ह अधिकाऱयाचा बळी दिला, असा आरोप कांदोळकर यांनी केला. फडते हे लोकांच्या तक्रारी येताच कारवाई करायचे. तार नदीचा विषय असो किंवा हणजूणमधील ध्वनी प्रदुषणाविरोधात त्यांनी नेहमीच एका सच्चा अधिकाऱयाप्रमाणे कारवाई केली आहे. मुळात सरकारी अधिकारी होण्यापूर्वी फडते यांन भाजप तसेच संघासाठी काम केले आहे. ते स्व. मनोहर पर्रीकर तसेच वाजपेयी यांची विचारधार माननाऱयातले. मात्र सरकार अधिकारी झाल्यानंतर ते कायद्याने काम करायचे. सरकारला हवे तसे काम करीत नव्हते म्हणूनच भाजपने त्यांना बार्देश उपजिल्हाधिकारी पदावरुन बाजूला केल्याचा आरोपही कांदोळकर यांनी केला.
सरकारच्या राजकारणी वृत्तीचा निषेध
राज्य सरकारने कपिल फडते यांची बदली रद्द करुन त्यांना पुन्हा बार्देश तालुक्याचे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करावे अशी मागणी किरण कांदोळकर यांनी केली. सरकारने बदली रद्द केली नाहीतर आम्ही सत्तेवर येताच त्यांना बार्देश उपजिल्हाधिकारी पदावर आणू. सरकारच्या या राजकारणी वृत्तीचा निषेध करीत असल्याचे कांदोळकर म्हणाले.