पोलीस पाटील यांना गावात रहात असल्याचे कसे माहीत नाही, राज शहा उर्फ गणेश शिंदे याची गुन्ह्याची सुरुवात मुंबईतून
सातारा / प्रतिनिधी
काल भुईंज पोलिसांनी साडे 31 लाखाची फसवणूक करणारा चांदवडी गावचा भामटा गणेश शिंदे याला जेरबंद केले.मात्र, एवढे दिवस चांदवडीत असून ही पोलिसांना का माहिती दिली गेली नाही.त्याचा सखा भाऊ पोलीस पाटील असल्याचीच दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.गुन्हेगारास पाठीशी घालणाऱ्यावर पोलीस नक्की काय कारवाई करणार?,असा सवाल उपस्थित होत आहे.
वाई तालुक्यातील चांदवडी गावचा भोंदू गणेश शिंदे हा लहानपणापासून ठग. त्याचे शिक्षण मुंबईत झाले. वडील गिरणी कामगार होते.त्यांनी असल्या प्रतापी मुलाला अनेक वेळा सुधारण्याची संधी दिली.पण ह्याने शाळा सोडून ठगगिरी सुरू केली.मुंबईत अगदी वकील, डॉक्टर मंडळींना सुद्धा गंडा घातला आहे.वाई तालुक्यातील अनवडी, बोपर्डी, दरेवाडी या गावात अनेकांना फसवले आहे.वाई पोलिसांनी त्याच्या एकदा मुसक्या आवळल्या होत्या.तो बाहेर जामिनावर होता.त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.असे असताना चार दिवसांपूर्वी तो अनवडीत बुवाबाजी करायला आल्याची माहिती मिळताच त्यास तेथील पोलीस पाटील दीपक गिरीगोसावी यांनी हुसकावुन लावले.मात्र इतके दिवस तो चांदवडीत कसा रहात होता पोलिसांना का माहिती दिली गेली नाही.पोलिसपासून दडवून ठेवले कोणी?,असे प्रश्न उपस्थित होत असून चांदवडीचे पोलीस पाटील योगेश शिंदे हे गणेश शिंदे याचे भाऊ लागतात.पोलीस पाटील म्हणून त्यांना विचारणा केली असता माहिती देता येत नाही.तुमच रेकॉर्डिंग केलं आहे. साहेबांना दाखवतो अशीच पत्रकारांची उलट तपासणी पोलीस पाटील घेत होते.त्यामुळे गणेश शिंदे या भामट्याला नक्की कोण पाठीशी घालत होते, अशी चर्चा वाई तालुक्यातून होत आहे.