वडगावच्या विराज राजापूरकर यांची कलाकुसरः 400 ग्रॅम चांदी-सोन्याचा वापर
प्रतिनिधी/ बेळगाव
अयोध्या येथे जगप्रसिद्ध असे प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधले जात आहे. हे मंदिर आपण आपल्या कलेतून तयार करावे, या उद्देशाने वडगाव येथील विराज राजापूरकर यांनी चांदी व सोन्याचा वापर करत अयोध्या येथील राम मंदिराची लहान प्रतिकृती तयार केली आहे. या मंदिराचे वजन 400 ग्रॅम असून त्यामध्ये अत्यंत सुक्ष्म असे कोरीव काम करण्यात आले आहे. रविवारी होणाऱया रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मंदिराची ही सुंदर प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
यरमाळ रोड, वडगाव येथे राहणारे विराज मागील पंधरा वर्षांपासून सोन्याच्या कलाकुसरीचे काम करतात. यापूर्वी त्यांनी अनेक सुक्ष्म दागिने तयार केले आहेत. त्यांनी चांदीमध्ये सुक्ष्म किल्ला व शिवाजी महाराजांचे सैन्य तयार केले होते. यावेळी त्यांनी शहापूर येथील ओमकार हेरेकर यांच्या सांगण्यानुसार अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांचे मंदिर चांदीपासून तयार केले आहे. या मंदिराला सोन्याचा कळस बसविण्यात आला आहे. चार इंच रुंद व आठ इंच लांब आकाराचे हे मंदिर तयार झाले आहे.
तब्बल दोन वर्षांनी मंदिर साकारले
अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांचे मंदिर उभारले जात आहे. त्याचीच प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न विराज यांनी केला आहे. यासाठी 170 लहान खांब तयार करण्यात आले. ते 4 खांब एकत्र जोडून मोठा खांब तयार करण्यात आला आहे. एकूण 72 लहान मंदिरे तयार करून त्यावर आकर्षक असे नक्षीकाम करण्यात आले आहे. सुटीच्या दिवशी फावल्या वेळेत काम करत तब्बल दोन वर्षांनी हे मंदिर साकारण्यात आले आहे. 395 ग्रॅम चांदी व 5 ग्रॅम सोन्याचा वापर या मंदिरासाठी करण्यात आला आहे. मंदिरात अतिशय सुक्ष्म अशी प्रभू श्रीरामाची मूर्ती बसविण्यात आली आहे.