जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बेमुदत धरणे आंदोलन सुरुच
वनविभागाने दिले आंदोलन स्थगित करण्याबाबत पत्र
प्रतिनिधी / कोल्हापूर
चांदोली अभयारण्यग्रस्त व वारणा धरणग्रस्त आपल्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वसाहतींमधील घरासमोर बुधवारी (दि.3) आंदोलन करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमिक मुक्ती दलातर्फे सुरु असलेले बेमुदत धरणे आंदोलन मंगळवारी दुसर्या दिवशीही सुरुच राहीले. दरम्यान, वनविभागाच्या अधिकार्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलन स्थगित करण्याबाबत निवेदन दिले. परंतु आंदोलकांनी पूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी यावेळी व्यक्त केला.
राज्य कार्यकारी अध्यक्ष संपत देसाई व जिल्हाध्यक्ष मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोजक्या प्रकल्पग्रस्तांसमवेत आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मंगळवारी आंदोलनस्थळी कोल्हापूर वनविभागाचे वनसंरक्षक सुनिल निकम व वन परिक्षेत्र अधिकारी सुनील सोनवले, वन परिमंडळ अधिकारी विजय पाटील, वनविभाग लेखापाल विश्वनाथ राठोड यांनी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याबाबत निवेदन दिले.
चांदोली अभयारण्यातील 751 प्रकल्पग्रस्तांना वन विभाग कार्यालयातून निर्वाह भत्याचे 2 कोटी 70 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. तसेच 65 टक्के रक्कमेवरील व्याज, शौचालय अनुदान व घरबांधणी अनुदान, तसेच नागरी सुविधांसाठी 25 कोटी 24 लाख 42 हजार रुपये इतके अनुदान कोल्हापूर वनसंरक्षक कार्यालयाकडे मागणी करण्यात आले आहे. ते प्राप्त होताच प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात येईल. असे या निवेदनात म्हंटले आहे.
परंतु आंदोलकांनी कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वसाहतींमधील घरासमोर बुधवारी (दि.3) आंदोलन करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.