भांडण सोडविण्यासाठी गेले असता झाला होता हल्ला
प्रतिनिधी/ बेळगाव
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका युवकावर चार दिवसांपूर्वी मार्केट यार्डजवळ चाकु हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला एपीएमसी पोलिसांनी बदामीजवळ अटक केली आहे. त्याच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कलमेश रामचंद्र चलवादी (वय 21, मुळचा रा. कित्तली, ता. बदामी, जि. बागलकोट) असे त्याचे नाव आहे. कलमेश हा बेळगाव येथील एका हॉटेलात काम करीत होता. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी कलमेशला अटक केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
मंगळवारी 8 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्डजवळ कलमेश आपल्या मित्राशी भांडत होता. त्यावेळी याच मार्गावरुन जाणारा अनिल जयवंत सुणगार (वय 31, रा. लक्ष्मीनगर, काकती) हा युवक भांडण सोडविण्यासाठी गेला. रस्त्यावर कशासाठी भांडता? असे सांगणाऱया अनिलवर चाकु हल्ला करण्यात आला आहे.
हल्ल्यात अनिल गंभीर जखमी झाला असून त्याला हुबळी येथील किम्स् इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. चाकु हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी कलमेशने आपला मोबाईल बंद ठेवून बेळगावातून पळ काढला होता. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी त्याला अटक केली आहे.