ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधील चादूरा येथील एसओजी कॅम्पमधून मंगळवारी मध्यरात्रीपासून एक विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) बेपत्ता आहेत. त्यासोबत छावणीतील 2 एके 47 रायफल आणि त्याची 3 मॅगझीनही गायब आहेत. या घटनेने छावणीत खळबळ उडाली असून, सुरक्षा दल एसपीओचा शोध घेत आहेत.
अल्ताफ हसन भट असे बेपत्ता एसपीओचे नाव आहे. मागील पाच वर्षांपूर्वी त्यांची पोलीस दलात एसपीओ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ते काझीपुरा बडगामचे रहिवासी आहेत. चादूरा पोलीस ठाण्यात त्यांची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, यापूर्वी चादूराच्या नागम परिसरात तैनात असलेला राजौरीचा एक एसएसबी कॉन्स्टेबल आपल्या आयएसएएस रायफलसह बेपत्ता झाला होता.