दोन दिवस भाविकांची गर्दी : सुमधूर गायनाने श्री फोंडेश्वराच्या आरतीचे प्रकाशन
वार्ताहर /चापगाव
येथील श्री फोंडेश्वर देवाची वार्षिक यात्रा बुधवारी उत्साहात पार पडली. दोन दिवस भाविकांची गर्दी होती. मंगळवारी सायंकाळी गावातील लक्ष्मी मंदिरापासून पालखी सोहळा उत्साहात पार पडला. आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते या पालखी सोहळय़ाची सुरुवात झाली. संपूर्ण पालखी सोहळय़ामध्ये त्यांनी सहभाग दर्शविला. त्यानंतर श्री फेंडेश्वर मंदिराच्या आवारामध्ये आरती प्रकाशन सोहळा झाला. यावेळी अंकिता बाळासाहेब शेलार व ग्रुप यांनी श्री फोंडेश्वर देवाची आरती सुमधुर स्वरात गायिली. आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच देवस्थान कमिटीच्यावतीने आमदार डॉ. निंबाळकर यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी हा सोहळा अविस्मरणीय असल्याचे सांगितले. व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य नागराज यळ्ळूरकर, उपाध्यक्ष मारुती चोपडे, माजी अध्यक्ष रमेश धबाले तसेच कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. देवस्थान कमिटी अध्यक्ष पिराजी कुऱहाडे यांनी मंदिर उभारणीसाठी आलेल्या खर्चाचे आढावा पत्रक व अहवाल प्रसिद्ध केला. या मंदिराच्या उभारणीसाठी जवळपास कोटी रुपयांचा खर्च आला असून रोख रक्कम स्वरूपात कमिटीकडे 34 लाख 40 हजार इतकी रक्कम जमा झाली होती. जमा-खर्च अखेर 31000 रुपये शिल्लक असून यापुढील काळात मंदिराचे व्यवस्थापन हाताळण्यासाठी कमिटीची कार्यप्रणाली कायम राहणार असून भाविकांनी सहकार्य करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मंदिराच्या आवारात धार्मिक विधी पार पडले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत इंगळय़ांचा कार्यक्रम झाला. बुधवार दि. 16 रोजी सकाळपासून दिवसभर मंदिरासमोर नवसफेड कार्यक्रम झाला. रात्री 10 वाजता श्री फेंडेश्वराचा पालखी प्रस्थान सोहळा झाल्यानंतर उत्सवाची सांगता झाली. या उत्सवाच्या निमित्ताने बुधवारी रात्री बहारदार लावणी कार्यक्रम झाला.