निवृत्त न्या. बी. ए. पाटील यांच्या समितीला महिनाभरात अहवाल देण्याची सूचना
प्रतिनिधी / बेंगळूर
चामराजनगर जिल्हा इस्पितळात ऑक्सिजनअभावी 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. ए. पाटील यांच्या नेतृत्वाखालील समिती हा तपास करणार असून त्यांना एक महिन्यात तपास पूर्ण करून अहवाल सादर करण्याचा आदेश सरकारने दिला आहे.
चामराजनगर आणि म्हैसूर जिल्हाधिकारी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या आयुक्तांना घटनेप्रकरणी अहवाल सादर करण्याची सूचना दिली आहे. सदर चौकशी अहवाल आयुक्तांनी न्या. बी. ए. पाटील यांच्या समितीकडे सादर करावा, असेही सरकारने आदेशात स्पष्ट केले आहे.
म्हैसूरमध्ये न्यायालयीन तपास आयोगाचे कार्यालय सुरू करण्याबरोबरच तेथे आवश्यक असणारे अधिकारी आणि कर्मचारी व इतर सुविधा पुरविण्याची सूचना आरोग्य-कुटुंब कल्याण खात्याच्या आयुक्तांना देण्यात आली आहेत. गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. रजनीश गोयल यांनी हा आदेश दिला आहे. रविवारी मध्यरात्री चामराजनगर जिल्हा इस्पितळात ऑक्सिजन साठा संपल्याने 24 रुग्ण दगावले होते. त्यामध्ये अधिकाधिक रुग्ण हे कोरोनाबाधित होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सरकारने केएसआरटीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या नेतृत्वाखाली तपास पथक नेमून तीन दिवसांत अहवाल देण्याची सूचना केली होती. आता सरकारने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.