प्रतिनिधी / फलटण :
शहरात चायनीज मांजच्या विक्रीला बंदी आहे. तरीदेखील फलटणमध्ये खुलेआम मांजाची विक्री सुरू असून, याच मांजाने शहरातील एका तरुणाचा गळा चिरला आहे. या जखमी तरुणाच्या गळ्याला 48 ते 50 टाके पडले आहेत.
उमेश हरी चव्हाण (वय 35, रा. झिरपवाडी, ता. फलटण) असे गळा चिरून जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 12 ऑगस्ट रोजी दुपारी चव्हाण हे वडजलवरून फलटणकडे येत असताना फलटण लोणंद रोडवर असलेल्या स्मशानभूमी परिसरात चायनीज मांजा त्यांच्या गळ्याला लागला आणि त्यांचा गळा चिरला. त्याला फलटण येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या गळ्यावर 48 ते 50 टाके टाकण्यात आले.
शहरासह तालुक्यात चायनीज मांजामुळे आतापर्यंत अनेकजण जखमी झाल्याने नागरिकांमधून चिनी मांजा विक्री करणाऱ्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.