जानेवारी 2021 पासून कडक अंमलबजावणी : केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सर्व चारचाकी वाहनांसाठी 1 जानेवारी 2021 पासून ‘फास्ट टॅग’ अनिवार्य केला आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने यासंदर्भात एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नुसार 1 डिसेंबर 2017 नंतर खरेदी करण्यात आलेल्या सर्व चारचाकी वाहनांसाठी जानेवारी 2021 पासून ‘फास्ट टॅग’ अनिवार्य करण्यात आला आहे. जुन्या म्हणजेच ज्यांची विक्री डिसेंबर 2017 च्या अगोदर झालेली आहे, अशा वाहनांसाठीही हा नियम लागू असणार आहे.
1 ऑक्टोबर 2019 पासून नॅशनल परमिट वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ लावणे बंधनकारक करण्यात आले होते. चारचाकी वाहनांच्या सर्व रजिस्ट्रेशनसाठी ‘फास्ट टॅग’ ला अनिवार्य केले गेले होते आणि ‘फास्ट टॅग’चा पुरवठा वाहन निर्माता किंवा डिलरद्वारे केला जात होता.