वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगाल महापालिका निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसने चारही महापालिकांमध्ये विजय मिळविला आहे. विधाननगर, आसनसोल, सिलिगुडी आणि चंदननगरमध्ये तृणमूलचा दबदबा दिसून आला आहे.
तृणमूलने 41 पैकी 39 जागांवर विजय मिळवित विधाननगर महापालिकेत पुन्हा सत्ता मिळविली आहे. तर भाजप आणि माकपला येथे खातेही उघडता आले नाही. काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला तर एक अपक्ष उमेदवार जिंकून आला आहे.
चंदननगरमध्ये तृणमूलने 32 पैकी 31 जागा जिंकल्या तर माकपला एका ठिकाणी यश मिळाले आहे. सत्तारुढ पक्षासाठी सिलिगुडी महापालिकेतील विजय महत्त्वाचा ठरला आहे. माकपच्या नेतृत्वाखालील आघाडीची सत्ता राहिलेल्या सिलिगुडीमध्ये तृणमूलने यंदा मोठे यश मिळविले आहे. येथील 47 पैकी 37 जागांवर तृणमूलचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपने 5 जागांवर यश मिळवत विरोधी पक्षाचा दर्जा मिळविला आहे. तर डाव्या आघाडीला 4 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसचा एकच उमेदवार विजयी झाला आहे.
आसनसोलमध्ये तृणमूलने 106 पैकी 66 जागांवर यश मिळविले आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्या पक्षाच्या प्रचंड विजयासाठी लोकांचे आभार मानले आहेत. चारही महापालिकांसाठी 12 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते.