दोन आरोपींना अटक, चार गुन्हय़ांत गुंतल्याचे स्पष्ट
प्रतिनिधी/ मडगाव
‘चार्ली टेलर’ या आस्थापनाकडे संलग्न असलेला सत्या राजकुमार तोमर या 25 वर्षीय आरोपीला आणि याच आस्थापनात नोकरीला असलेला रोहीत रमेश लोट (19) या आरोपीला मडगाव पोलिसांनी मडगावातील अनेक चोरीप्रकरणी अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार एका चोरीप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी सर्वप्रथम रोहीत रमेश लोट या चोरटय़ाला अटक केली होती. मात्र फातोर्डा पोलिसांच्या तपासात ही चोरी मडगाव पोलीस स्थानकाच्या हृद्दीत घडलेली असल्यामुळे फातोर्डा पोलिसांनी या आरोपीला मडगाव पोलिसांकडे सुपूर्द केले.
मडगाव पोलिसांनी रोहीत रमेश लोट या आरोपीची सखोल चौकशी केली तेव्हा आपल्याबरोबर आपला दुसरा एक साथीदार असल्याची माहिती दिली. सत्या राजकुमार तोमर उर्फ ‘चार्ली टेलर’ या चोरीत गुंतलेला असल्याची माहिती लोट याने मडगाव पोलिसाना देताच ‘चार्ली टेलर’ उर्फ सत्या राजकुमार तोमर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नंतर या चोरीत त्याचा हात असल्याचे स्पष्ट होताच त्यालाही अटक करण्यात आली.
सत्या राजकुमार तोमर हा अनेक चोरीप्रकरणात गुंतलेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मडगावात अनेक चोऱया झाल्या होत्या. त्यातील चार चोऱया या आरोपींनी केल्याचे तपासात उघड झालेले असल्याची मडगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांनी माहिती दिली.