हिंगोरानी भागात सैन्याची धडक कारवाई – मोहीम सुरूच
वृत्तसंस्था / इम्फाळ
मणिपूरच्या हिंगोरानीमध्ये संयुक्त मोहिमेदरम्यान आसाम रायफल्स आणि भारतीय सैन्याच्या 3 कोरसह सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ही मोहीम शनिवारी सुरू करण्यात आली होती आणि रविवारी सकाळी दोन्ही बाजूने गोळीबार करण्यात आला. मोहीम अद्याप सुरू असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. मारले गेलेले दहशतवादी कुकी समुहाचे होते.
मागील आठवडय़ातच एनआयएने कुकी उग्रवादी गट युकेएलएफच्या एका स्वयंघोषित अध्यक्षाला शस्त्रास्त्रांची तस्करी आणि देशाविरोधात कारवाया घडवून आणल्याप्रकरणी अटक केली होती. युनायटेड कुकी लिबरेशन प्रंटचा (युकेएलएफ) स्वयंघोषित अध्यक्ष लुंखोसन हाओकिप फरार होता. त्याच्यावर आसाम रायफल्सची शस्त्रास्त्रs चोरण्याचाही आरोप होता.
काही दिवसांपूर्वी मणिपूर पोलिसांनी प्रतिबंधित उग्रवादी संघटना पीपल्स रिव्होल्युशनरी पार्टी ऑफ कंगलीपाक-प्रोगेसिव्हच्या एका सक्रिय कॅडरला इम्फाळ पश्चिम जिल्हय़ामधून अटक केली होती. त्याच्याकडून मोठय़ा प्रमाणात आयईडी स्फोटकसामग्री हस्तगत करण्यात आली होती.