सेन्सेक्सची 149 अंकांची घसरण : निफ्टी 11,896.45 वर बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील चार सत्रात भारतीय भांडवली बाजाराने तेजी कायम ठेवलेली होती. परंतु अखेर आठवडय़ातील चौथ्या दिवशी गुरुवारी तेजीला विराम घ्यावा लागला आहे. जागतिक पातळीवरील नकारात्मक वातावरणामुळे निर्देशांकाने आपला कल बदलला असल्याचे दिसून आले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीत रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँक यांचा प्रवास घसरणीसोबत बंद झाला. या घटनेचा प्रभाव म्हणून बीएसई सेन्सेक्स 149 अंकांनी घसरला होता. दिवसभरातील कामगिरीनंतर बाजार बंद होताना सेन्सेक्स 148.82 अंकांनी घसरुन निर्देशांक 40,558.49 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 41.20 अंकांसह 11,896.45 वर स्थिरावला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये गुरुवारी इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक 3 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. सोबत आयसीआयसीआय बँक, टायटन, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, नेस्ले इंडिया, सन फार्मा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचेही समभाग नुकसानीसह बंद झाले. दुसऱया बाजूला मात्र एनटीपीसी, भारती एअरटेल, बजाज फायनान्स आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग मजबूत स्थितीत राहिले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर आशिया आणि अन्य बाजारांमध्ये चीनचा शांघाय, जपानचा टोकीओ आणि दक्षिण कोरियाचा सोल हे नुकसानीसोबत बंद झाले. हाँगकाँगचा बाजार तेजीत आणि युरोपातील प्रमुख बाजार घसरणीत राहिले आहेत. अंातरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूडचा भाव हा 0.22 टक्क्यांच्या वाढीसोबत 41.52 डॉलर प्रति बॅरेलवर राहिला आहे.
आगामी काळात देशात सणासुदीचे वातावरण राहणार आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणून विविध क्षेत्रातील खरेदी विक्रीत तेजी दिसण्याचे संकेत व्यक्त होत आहेत. याच बदलाचा लाभ येणाऱया दिवसांमध्ये गुंतवणूकदार उठवण्याची शक्यता तज्ञांकडून बोलली जात आहे. तरीही सावधगिरी बाळगण्याची सूचना तज्ञांनी केली आहे.