गुरुवारी 66 जण झाले कोरोनामुक्त तर 54 जणांना बाधा
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या चार दिवसांमध्ये बेळगाव शहर व जिल्हय़ात 118 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. गुरुवारी 54 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर कोरोनामुक्त झालेल्या 66 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. बुधवारी एका 67 वषीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा आरोग्य विभागातील अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार काकती, सांबरा, कंग्राळी खुर्द, गणेशपूर, मुचंडी, सह्याद्रीनगर, भाग्यनगर, रुक्मिणीनगर, टिळकवाडी, ब्रम्हनगर, अनगोळ, वडगाव, न्यू गांधीनगर, शहापूर, गणपत गल्ली, सदाशिवनगर, अंजनेयनगर, नेहरुनगर, खासबाग, विनायकनगर, लक्ष्मीनगर, माळमारुती, रामतीर्थनगर, वैभवनगर, हनुमाननगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
सोमवार दि. 9 ते गुरुवार दि. 12 नोव्हेंबरपर्यंतच्या चार दिवसांत जिल्हय़ातील एकूण 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण रुग्णसंख्या 25 हजार 95 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 24 हजार 332 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 338 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 425 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
अद्याप 1 हजार 843 जणांचे अहवाल यायचे आहेत. जिल्हय़ातील 2 लाख 45 हजार 187 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली. यापैकी 2 लाख 16 हजार 841 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. बेळगाव शहर व उपनगरांसह जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्या कमी होत चालली आहे. तरीही नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
निमोनियामुळे मृत्यू अधिक
आतापर्यंत कोरोना महामारीमुळे जिल्हय़ातील 338 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी अधिकाधिक जण ‘कोविड-निमोनिया’मुळे दगावले आहेत. अशी माहिती सामोरी आली आहे. श्वसनाच्या त्रासामुळे अधिकाधिक जणांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे प्रत्येकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.