वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुबईमध्ये सुरू असलेल्या आशियाई युवा मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या चार मुष्टीयोद्धय़ांनी विविध वजन गटात उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. या स्पर्धेत सोमवारी भारताच्या दक्ष सिंगसह सात स्पर्धकांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. पण त्यापैकी चार जणांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
भारताच्या जयदीप रावतने 71 किलो वजन गटात संयुक्त अरब अमिरातच्या मोहम्मद इसाचा दुसऱयाच फेरीत पराभव करत शेवटच्या चार स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले. 63 किलो वजन गटात भारताच्या वंशजने ताजिकस्तानच्या दाऊदचा 5-0, त्याचप्रमाणे भारताच्या दक्ष सिंगने 67 किलो वजन गटात किर्गिजस्तानच्या तुर्दुबायेव्हचा 4-1, सुरेश विश्वनाथनने 48 किलो वजन गटात किर्गिजस्तानच्या झोल्बोरोसव्हचा 5-0 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. भारताच्या व्हिक्टर सायखोम सिंग तसेच विजय सिंग आणि रविंद्र सिंग यांना प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव पत्करावा लागला.
या स्पर्धेत युवा गटात सुवर्णपदक मिळविणाऱया स्पर्धकाला 6 हजार अमेरिकन डॉलर्सचे तसेच रौप्य आणि कांस्यपदक विजेत्या स्पर्धकाला अनुक्रमे 3000 आणि 1500 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस दिले जाईल. कनिष्ठ गटात सुवर्णपदक विजेत्याला 4000, रौप्यपदक विजेत्याला 2000 आणि कांस्यपदक विजेत्याला 1000 डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.