‘ड्राय रन’ घेण्याची केंद्र सरकारची योजना : लवकरच सार्वत्रिक लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार
वृत्तसंस्था / गुवाहाटी
देशभरात कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम त्वरेने क्रियान्वित करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. याच योजनेचा एक भाग आणि पूर्वतयारी म्हणून चार राज्यांमध्ये ‘ड्राय रन’ चाचणी (अतिजलद चाचणी) डिसेंबरच्या 28 आणि 29 या दिनांकांना घेतली जाणार आहे. यासाठी आसाम, गुजरात, आंध्र प्रदेश आणि पंजाब या राज्यांची निवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
देशपातळीवर कोरोनाचे व्यापक लसीकरण करण्याची केंद्राची सज्जता किती आहे, याची पडताळणी या अतिजलद चाचणी कार्यक्रमातून होणार आहे. लवकरच देशव्यापी लसीकरण कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. देशव्यापी लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यापूर्वी प्रशासनाला योग्य तो अनुभव येण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी या चाचण्या घेण्यात येणार आहेत.
देशव्यापी लसीकरणाच्या कार्यक्रमात प्रथम टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यासाठी विविध पातळय़ांवर काम करावे लागणार आहे. हे लसीकरण जगातील सर्वात मोठे ठरणार असून ते अत्यल्प कालावधीत करण्याची योजना आहे. म्हणून हा 2 दिवसांचा कार्यक्रम 4 राज्यांमध्ये हाती घेतला जाणार आहे. गर्दीचे व्यवस्थापन, लस टोचल्यानंतर होणाऱया परिणामांचे व्यवस्थापन, लस टोचून घेणाऱयाला त्रास झाल्यास करावयाची उपाययोजना आणि या उपाययोजनेचे व्यवस्थापन आणि एकंदर लसीकरण कार्यकमासाठी लागणाऱया कर्मचारीवर्गाचे व्यवस्थापन अशा विविध बाबींचा अनुभव या दोन दिवसांच्या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. एकंदर, ही व्यापक लसीकरणाची रंगित तालीम असेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने शुक्रवारी पत्रकारांना दिली.
हजारो कर्मचाऱयांचा सहभाग
या दोन दिवसांच्या अतिजलद कार्यक्रमात 2,360 प्रशिक्षित कर्मचारी, 7 हजार जिल्हा पातळीवरचे कर्मचारी व प्रशिक्षणार्थी, 2 हजारांहून अधिक डॉक्टर्स, अनेक लसीकरण अधिकारी, शीतसाखळी अधिकारी, लस निर्मिती भागीदार, आयसीई अधिकारी आदी लोकांचा सहभाग असेल असे स्पष्ट करण्यात आले. केंद्र सरकारच्या व्यापक योजनेत राज्यांचाहीं महत्वाचा सहभाग राहणार आहे. यासाठी त्यांना तयारीचे आदेश देण्यात येणार आहेत. लवकरात लवकर कोरोना आटोक्यात आणला जाणार आहे.
शंकासमाधानासाठी पोर्टल
लसीकरणाच्या कार्यक्रमासंबंधी लोकांना असणारे प्रश्न आणि शंका यांचे समाधान करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष पोर्टल तयार केले आहे. यावर लोकांना देशव्यापी लसीकरण कार्यक्रमाची सर्व माहिती सविस्तररित्या उपलब्ध केली जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवर 1 हजार 75 साहाय्य वाहिन्या तर राज्य पातळीवर 104 साहाय्य वाहिन्या (हेल्प लाईन्स) उपलब्ध केल्या जाणार आहेत.