तरुण भारत संवाद
प्रतिनिधी/ पंढरपूर
विठ्ठल विठ्ठल गजरी
अवघी दुमदुमली पंढरी
चंद्रभागेच्या तीरावर आज माघ शुद्ध एकादशीनिमित्त संपूर्ण पंढरीनगरी ही विठूनामाच्या जयघोषात न्हाउन निघाली होती. या एकादशीचा सोहळ्यासाठी सुमारे चार लाख भाविकांनी हजेरी लावली होती. गेल्या काही वर्षातील माघी एकादशीच्या तुलनेत यंदा झालेली भाविकांची गर्दी सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे.
माघ महिन्यातील आजच्या जया एकादशीनिमित्त विठ्ठलाची पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते सपत्नीक नित्यपूजा करण्यात आली. तर रुक्मिणी मातेची पूजा मंदिर समितीचे लेखाधिकारी सुरेश कदम यांच्या हस्ते सपत्नीक झाली. यावेळी समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ.माधवी निगडे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.
विठुरायाच्या नित्य पूजेनंतर माघी एकादशीच्या अनुपम अशा सोहळ्यास सुरूवात झाली. पहाटेपासूनच भाविकांनी चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी गर्दी केली होती. चंद्रभागा स्नानानंतर विठुरायाची शिखरदर्शन नामदेवपायरी दर्शन करीत लाखो भक्तांनी ज्ञानोबा तुकाराम यांच्या गजरात नगरप्रदक्षिणा पूर्ण केली आणि एकादशीचे व्रत आणि पंढरीची वारी सत्कारणी लावली.
या एकादशीच्या निमित्ताने पुणे येथील मोरया ग्रुपच्या वतीने शेवंती, झेंडू, स्प्रिंगर, जरबेरा अशा वेगवेगळया दोन टन फ्gढलांची सजावट मंदिरामध्ये करण्यात आली होती. त्यामुळे मंदिराचे दृष्य देखिल विलोभनीय दिसत होते.
आज एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे पर्यंत जाऊन पोहोचली होती. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी साधारणपणे दहा तासांचा कालावधी लागत होता. तर थेट विठ्ठल मंदिराच्या गाभाऱयामध्ये एका मिनिटाला 40 भाविक दर्शन घेत होते. मुखदर्शनासाठी देखील साधारणपणे दोन तासाचा कालावधी आज लागत होता. कार्तिकी यात्रेनंतर माघीलाही जनावरांचा बाजार भरतो. या बाजारासाठी देखिल हजारो जनावरे दाखल झाली होती.