पोलिसांनी दाखवली माणुसकी, केले कुटुंबीयांच्या स्वाधीन : लेकीला पाहताच वडिलासह पोलीसही गहिवरले
प्रतिनिधी / बेळगाव
एखाद्या पोलीस अधिकाऱयाने मनात आणले तर समाजात तिरस्कृतांचे जीवन जगणाऱयांनाही नवी उमेद मिळू शकते. चाकोरीबाहेर जाऊन जर थोडे प्रयत्न केले तर एका कटू अध्यायाचा शेवट गोड करणे नक्कीच शक्मय होते, याची प्रचिती मंगळवारी सायंकाळी एपीएमसी पोलीस स्थानकात आली.
7 फेब्रुवारी रोजी एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी सदाशिवनगर येथील एका घरावर छापा टाकला होता. दोन परप्रांतीय तरुणींची सुटका करून त्यांना वाममार्गाला लावणाऱया दोघा जणांना अटक करण्यात आली होती. पूर्वी वेश्याव्यवसायात गुंतलेल्या महिलांवरही एफआयआर दाखल केला जात होता.
आता पीडित महिलांची सुटका केली जाते. केवळ त्यांना वाममार्गाला लावणारे दलाल आणि त्यांचा उपभोग घेणाऱया ग्राहकांवर कारवाई करण्याची कायद्यात तरतूद आहे. पीडित महिलांची सुटका केली जाते. जर त्यांना राहण्याची व्यवस्था नसेल तर एखाद्या सुधारगृहात त्यांची व्यवस्था केली जाते. या प्रकरणातही असेच झाले.
मुंबई येथील एका तरुणीला पोलिसांनी महिला कल्याण संस्थेच्या उज्ज्वला महिला संरक्षण व पुनर्वसन केंद्रात पाठविले होते. तेथील योजनाधिकारी सुरेखा पाटील यांच्या निगराणीखाली या तरुणीला ठेवण्यात आले. केवळ तिला पुनर्वसन केंद्रात ठेवून पोलीस थांबले नाहीत. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी त्या तरुणीच्या मागे महिला पोलिसांना लावून ही तरुणी कोणत्या गावाहून आली आहे, शरीरविक्रय व्यवसायात तिला कोणी ढकलले, याची माहिती मिळविण्यास प्रारंभ केला.सुरुवातीला त्या तरुणीने पोलिसांना प्रतिसाद दिला नाही. आपण मुंबईची आहे. आपल्याला मुंबईला पाठवून द्या, अशी ती मागणी करायची. तरीही पोलिसांनी धीर सोडला नाही. सतत प्रयत्न केल्यामुळे ही तरुणी उत्तर प्रदेशमधील गाझियाबादची असल्याची माहिती मिळाली. तातडीने गाझियाबाद पोलिसांना तिची माहिती पाठविण्यात आली. त्यावेळी बेळगाव पोलिसांना धक्का बसला.
2017 मध्ये वयाच्या 17 व्या वषी लग्नाचे आमिष दाखवून तिच्या प्रियकराने तिचे अपहरण केले होते. तब्बल पंधरा दिवस घराबाहेर राहिल्यानंतर गाझियाबाद रेल्वेस्थानकावर तिला सोडून प्रियकर निघून गेला होता. पंधरा दिवस घराबाहेर राहून आता परत घरी जायचे नाही, या विचाराने ती तरुणी रेल्वेत बसली. तिने मुंबई गाठली. मुंबईत भटकताना एका महिलेची तिच्यावर नजर पडली. तिच्याविषयी खोटी आपुलकी दाखवून त्या महिलेने तिला डान्सबारमध्ये कामाला लावले. नंतर पुण्याच्या एका कुंटणखान्यात तिची विक्री करण्यात आली.
प्रियकराने दगा दिल्याने गाझियाबाद रेल्वे स्थानकातून सुरू झालेला तिचा वनवास काही संपला नाही. पुण्याच्या घरवालीने तर वेगवेगळय़ा शहरात मागणीनुसार तिची रवानगी केली. अशाच पद्धतीने ती बेळगावला येऊन पोहोचली. बेळगाव पोलिसांनी केवळ कारवाई करून न थांबता तिला तिच्या कुटुंबीयांकडे सोपविण्याचे ठरविले. याची गाझियाबाद पोलिसांना माहिती देण्यात आली.
वयाच्या 17 व्या वर्षी ही तरुणी परिस्थितीमुळे वाममार्गाला लागली होती. ती आता एकविशीत आहे. कुटुंबीयांच्याही ती संपर्कात नव्हती. अखेर गाझियाबाद पोलिसांसमवेत मंगळवारी तिचे वडील बेळगावात दाखल झाले. एपीएमसी पोलिसांत पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या उपस्थितीत या तरुणीला वडिलांकडे सोपविण्यात आले. वडिलांना पाहताच तिने घट्ट मिठी मारून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बाप-लेकीची ही भावनिक भेट पाहून उपस्थित पोलिसांनाही गहिवरून आले.