मालवण वाहतूक पोलिसांकडून सात महिन्यांत नऊ लाखाची दंडात्मक कारवाई
वार्ताहर / मालवण:
जानेवारी 2020 ते जुलै 2020 या कालावधीत मालवण शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून दुचाकी व चारचाकी चालवणाऱया 4057 वाहन चालकांवर मालवण वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत 4057 वाहन चालकांवर 9 लाख 6,500 एवढी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मालवण शहरात ट्रीपल सीट दुचाकी चालवणे, लायसन नसणे, नंबर प्लेट नसणे, नंबर प्लेट तुटलेली असणे, नो पार्किंग एरियात दुचाकी व चारचाकी लावणे, हेल्मेट नसणे, सीट बेल्ट न लावणे, इन्श्युरन्स, आरसी बुक व पीयुसी नसणे, दुचाकी चालवताना मोबाईलवर संभाषण करणे, दारू पिऊन वाहन चालवणे आदीप्रकरणी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मालवण भरड नाका व बाजारपेठ येथे वाहतूक पोलीस कर्मचारी शेखर मुणगेकर, गुरुप्रसाद परब, देवेंद्र लुडबे, समीर जंगले, अमित हरमलकर यांनी ही दंडात्मक कारवाई केली.
महिना वाहनधारक संख्या दंडात्मक कारवाई (रुपयांत)
जानेवारी 304 72,000
फेब्रुवारी 440 93,300
मार्च 496 1,13,700
एप्रिल 409 93,500
मे 745 1,69.300
जून 854 1,83,800
जुलै 869 1,80,900
………………………………………………………………………………………..
एकूण 4,117 9,06,500