/ प्रतिनिधी/ कराड
कराडलगत खोडशी गावच्या हद्दीत महामार्गाकडेला उभा राहिलेल्या मालट्रकला भरधाव कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याची घटना रविवारी रात्री घडली. कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनरच्या चालकासह क्लीनर जागीच ठार झाला. विश्वनाथन जगन्नाथन (वय 33, रा. वेलामपट्टी, अथूर-तामिळनाडू) व सुब्बराम सिरंगराम आर (वय 36, रा. विसू वसापुरम, आम्मापट्टी, तामिळनाडू) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर बाजूकडून पुण्याकडे निघालेला मालट्रक कराडपासून पुढे खोडशीजवळ आला. रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास खोडशी गावच्या हद्दीतील हॉटेल अरोमासमोर मालट्रक महामार्गावरच रस्त्याकडेला थांबला. काही वेळानंतर कोल्हापूरकडून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर चालकाचा ताबा सुटल्यामुळे मालट्रकला जोराची धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, कंटेनरच्या केबीनमधील चालकासह क्लीनर जखमी अवस्थेत केबिनमध्ये अडकून पडले.
अपघाताची माहिती मिळाल्यावर कराड शहर पोलीस ठाण्यातील हवालदार प्रशांत जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कंटेनरमध्ये अडकलेल्या जखमींना केबिनमधून बाहेर काढत उपचारासाठी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी महामार्गावर रात्री अंधारात मालट्रक उभा करून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी मालट्रकचा चालक ए. के. सुनीलन (वय 51, रा. आतीकवील हाऊस, ता. पुमंगलम, केरळ) याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार प्रशांत जाधव यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.