केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील निर्यात चालू आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये 410 अब्ज डॉलर्सवर पोहचणार असल्याचे संकेत वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केले आहेत. असोचॅमच्या वार्षिक अधिवेशनात सहभागी झाल्यानंतर हे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
चालू आर्थिक वर्षात निर्यातीचा वरील आकडा प्राप्त करण्याचे संकेत असून देशातील वस्तूंची निर्यात चालु आर्थिक वर्षातील पहिल्या 10 महिन्यात एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत 374.05 अब्ज डॉलर्सची राहिली आहे. हा आकडा मागील आर्थिक वर्षाच्या समान कालावधीतील 256.55 अब्ज डॉलर्सच्या आकडेवारीपेक्षा 45.80 टक्के अधिक राहिला आहे.
विविध संकटातही निर्यात मजबूत राहिल
सध्याच्या स्थितीमध्ये आशिया व युरोपमध्ये निर्माण झालेल्या समस्येमुळे सरकार 400 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे ध्येय प्राप्त करण्याचा प्रवास निश्चितपणे पूर्ण करणार असल्याचे मंत्री गोयल यांनी स्पष्ट केले आहे.