स्पेस एक्स कंपनीचा प्रयोग यशस्वी, 2 चालकांनी केले यानाचे नियंत्रण
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेच्या 40 अंतराळवीरांचे रविवारी पृथ्वीवर सुखरूप अवतरण झाले आहे. अशी घटना 45 वर्षांमध्ये प्रथमच घडली असून यामुळे मानवाचा अंतराळ प्रवास सुलभ होण्याच्या दृष्टीने या प्रयोगाचे यश महत्वपूर्ण मानण्यात येत आहे. या अंतराळवीरांमध्ये डॉक्टर्स, परिचारिका व काही प्रशिक्षित नागरिकांचा समावेश होता. या साऱयांना पृथ्वीवर उतरल्यानंतर आनंदाचे भरते आले होते.
एलन मस्क यांच्या स्पेस एक्स या कंपनीने हे यान अंतराळात प्रक्षेपित केले होते. या यानातील एका कुपीत (कॅप्सूल) या 40 अंतराळवीरांचे वास्तव्य होते. विशिष्ट वेळ अंतराळात भ्रमण केल्यानंतर यान पृथ्वीच्या जवळ आणण्यात आले आणि त्यातून अंतराळवीरांची कुपी पृथ्वीवर पॅराशूटच्या साहाय्याने अलगद सोडण्यात आली. ती रविवारी मेक्सिकोच्या आखातानजीक समुद्रात यशस्वीरित्या उतरविण्यात आली. यानाचे नियंत्रण करणाऱया चालकांची नावे डोग हर्ली आणि बॉब बेन्हकेन अशी आहेत. या अंतराळ मोहिमेचे ‘एन्डीएव्हर’ असे नामकरण करण्यात आले होते, अशी माहिती कंपनीने दिली.
असे झाले अवतरण
कुपी पृथ्वीवर सोडण्याच्या आधी यानाचा वेग 17 हजार 500 किलोमीटर प्रतितास इतका होता. तो झपाटय़ाने 560 किलोमीटर प्रतितास इतका कमी करण्यात आला. नंतर काही वेळातच तो 15 किलोमीटर प्रतितास इतका पातळीवर आणण्यात आला. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर यानाचे तापमान घर्षणामुळे 3,500 डिग्री फॅरनहाईट इतके वाढले होते.
यानातून कुपी सोडल्यानंतर ती साधारणतः अर्ध्या तासात समुद्रात उतरली. यावेळी आतील अंतराळवीरांना थोडासा धक्का बसला. मात्र, आपण सुखरूप परतल्याचा आनंद अधिक मोठा होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी नंतर व्यक्त केली. अनेकांनी मनातल्या मनात देवाचे आभारही मानले.
माध्यमांकडून प्रक्षेपण
अमेरिकेतील अनेक प्रसार माध्यमांनी या थरारक घटनेचे प्रत्यक्ष प्रक्षेपण करून कोटय़वधी दर्शकांना या घटनेचे दर्शन घडविले. यानाचा एकंदर परतीचा प्रवास अत्यंत सुरळीतपणे पार पडला. मात्र कुपी समुद्रात उतरल्यानंतर खरी अडचण निर्माण झाली. यावेळी त्या भागात अनेक खासगी नौका होत्या. त्यांनी उत्सुकतेपोटी कुपीभोवती आपल्या नावा आणून गर्दी केली. त्यांना हटविण्याचे काम कुपीच्या संरक्षणासाठी पाठविण्यात आलेल्या नौकांना करावे लागले.
आरोग्य परीक्षण
सर्व अंतराळ प्रवासी असलेली कुपी समुद्रतटावर आणून या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. पुढील काही दिवस त्यांचे परीक्षण करण्यात येणार आहे. अंतराळ प्रवासाच्या त्यांच्या आरोग्यावर कोणता परिणाम झाला, याचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. ही मोहीम भविष्यकाळात नागरीकांना अंतराळ प्रवास करण्यास उपयुक्त ठरणार आहे. स्पेस एक्स कंपनी आगामी काळात व्यापारी तत्वावर अशा अवकाश प्रवास मोहिमा हाती घेणार आहे.